नायलॉन मांजा वापर, विक्री, साठा करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. तरी छुप्या मार्गाने याची विक्री जोरात सुरु असून याचा फटका घराशेजारी खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीला बसला आहे. गळ्यावर मांजा घासल्याने तिचा गळा कापला गेला असून तिला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले.
नागपुरातील फारुख नगरमधील पाच वर्षीय शबनाज बेगम शाळेतून घरी आली आणि त्यानंतर ती घराशेजारी खेळत होती. बाजूच्या दुसऱ्या इमारतीवर मुले पतंग उडवत होते. दरम्यान एक पतंग कटली. त्या पतंगाचा मांजा पकडण्यसाठी परिसरातील मुलांनी धडपड सुरु केली. एका मुलाच्या हाती मांजा लागल्यानंतर त्याने, तो मांजा ओढण्यास सुरुवात केली. दरम्यान मांजा पीडितेच्या गळ्याला घासून गेल्याने तिच्या गळ्याला खोलवर जखम झाली. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या चिमुकीला आजूबाजूच्या लोकांनी लगेच रुग्णालयात दाखल केले. यात मुलीच्या मानेला 26 टाके घालावे लागले असून तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर पतंग उडवणाऱ्या मुलांनी तिथून पळ काढला.