नांदेडमध्ये पोलीस भरतीत उत्तेजीत इंजेक्शन घेतलेला उमेदवार ताब्यात घेण्यात आला आहे. मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरण्यात येणारं उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन देखील या उमेदवाराकडे सापडलं आहे. तर नांदेड पोलिसांकडून याप्रकरणी संबधित तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.
सद्या राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरती प्रकिया सुरु आहे. दरम्यान नांदेड पोलीस दलात देखील 185 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी रोज सकाळी पाच वाजेपासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे ही प्रक्रिया सुरु होते. दरम्यान आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास उमेदवाराचे अर्ज छाननी करून कागदपत्र तपासुन पुढील भरती प्रक्रिया करीता बायो मॅट्रीक चाचणी पूर्ण करून उमेदवारांना मुख्य ग्राऊंड मध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरु होती. या दरम्यान एक उमेदवार लघुशंकेचे कारण सांगत बाथरूमकडे गेला. मात्र त्याच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवून त्याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ 1 इंजेक्शनची सिरींज आढळून आली. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता, ऑक्सीबुस्टर नावाचे उत्तेजित करणारे हे औषध असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेता येत नाही. तर संबधित उमेदवारास भरती प्रमुखाकडे हजर करण्यात आले. भरती कमिटीने त्याला भरती प्रक्रियेमधून अपात्र ठरवले असून, त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
