मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने आज सकाळी छापे टाकले. त्यामुळे कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. नंतर आता यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या घरांवर आणि माझ्या नातेवाईकांच्या घरांवर ईडीची छापेमारी सुरू आहे. माझ्या मुलीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली. मी काही कामानिमित्त बाहेर आहे, त्यामुळे मला ही सर्व माहिती फोनवरूनच मिळाली. तसेच मी प्रसारमाध्यमांद्वारे असे ऐकत आहे की, माझ्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे. परंतु मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शांत राहावे. कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये. सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.