नाशिक : जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. याविरोधात नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने सोमवारी मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व पालकमंत्री दादा भुसे यांच्यात दोन तास चर्चा झाली. मात्र, शासन स्तरावरून जोपर्यंत अधिकृत ठाम निर्णय व आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी दिला. पालकमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ सहकार मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. त्यानुसार सहकार मंत्री अतुल सावे यांनी थकीत कर्जावर सरळ व्याजाने सहा ते आठ टक्के व्याज आकारले जाईल, शेतकऱ्यांकडून केली जाणारी कर्जाच्या सक्तीच्या वसुलीत शिथिलता आणली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती पालकमंत्री भुसे यांनी व्हिडीओ जारी करत दिली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री अतुल सावे यांचे पालकमंत्री भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.
