अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं भाजप नेत्याला चांगलंच महागात पडलंय. चंद्रपूर (Chandrapur) पोलिसांनी त्याला वर्षभरासाठी तडीपार केलं आहे. खेमदेव गरपल्लीवार (Khemdev Garpalliwar) असं या व्यक्तीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. अमृता फडणवीस यांचं एक पंजाबी गाणं नुकतंच रिलीज झालंय. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायावर मत मांडलं होतं. ते ऐकून गरपल्लीवार यांनी यासंबंधीची आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते.
त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना वेश्या व्यवसायावर भाष्य केलं होतं. वेश्या व्यवसाय अधिककृत करून अशा महिलांना परवाना दिला जावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. देह विक्री हा पुरातन व्यवसाय आहे. अशा महिलांमुळेच समाजात बॅलन्स टिकून राहतं. त्यामुळे देह विक्रय करणाऱ्या महिला खऱ्या अर्थाने समाजाच्या अविभाज्य घटक आहेत. अशा महिलांना समाजात मानाचं स्थान मिळालं पाहिजे, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं.
यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. त्यापैकीच एक खेमदेव गरपल्लीवार यांची प्रतिक्रिया होती. खेमदेव गरपल्लीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजप नेत्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. खेमदेव यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातून आता हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.