धुळे प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीणजिल्हाध्यक्ष पदी शिरपूरचे बबनराव चौधरी यांची तर शहरजिल्हाध्यक्ष म्हणून गजेंद्र अंपळकर यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी हि नियुक्ती केली.
विद्यमान पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक कार्यकाळ पूर्ण झाल्याने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ह्या नियुक्त्या केल्या आहेत. धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे . ते १९८० पासून भाजपशी संलग्न असून त्यांनी भाजप युवा मोर्चा भाजप शहराध्यक्ष , जिल्हाचिटणीस , जिल्हाउपाध्यक्ष , जिल्हाह्द्यक्ष , प्रदेश कार्यकारणी सदस्य अश्या विविध पदांवर काम केले आहे . पक्षाने त्यांना म्हाडाचे नाशिक विभाग उपसभापती पदाचीही संधी यापूर्वी दिली आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, बँक , बाजार समिती,सूत गिरणी आणि विधानसभा अश्या १९ निवडणूक आजपर्यंत लढल्या आहेत. पैकी ५ वेळा ते विजयी झाले आहेत. त्यांचे पक्षकार्य बघून त्यांच्या पुन्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
शहरजिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेले गजेंद्र अंपळकर गेल्या ९ वर्षांपासून भाजप महानगर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. हरहर महादेव विजय व्यायामशाळेचे ते संस्थापक अध्यक्ष असून धुळे जिल्हा तालीम संघ आणि धुळे तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष म्हणून हि जबाबदारी सांभाळली आहे. खासदार डॉ सुभाष भामरे यांचे ते विश्वासू,निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या वहीनी कल्याणी अंपळकर यांनी उपमहापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
या दोन्ही पदाधिकारच्या नियुक्तीमुळे जिल्हाभरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

