शिंदखेडा पोलीस ठाण्यावर दगडफेक,वाहनाच्या काचा ही फोडल्या

शिंदखेडा (प्रतिनिधी समाधान ठाकरे,दोंडाईचा) : शिंदखेडा पोलीस ठाण्यावर शुक्रवारी रात्री उशिरा जमावाने दगडफेक केली. तसेच आवारात उभ्या असलेल्या सरकारी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. एका संशयितांवर पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी ‘आमच्या ताब्यात द्या’ असे सांगत काही जणांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. जमावाला चिथवून पोलीस ठाण्यावरच दगड-विटांचा मारा केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
पोलीस कॉन्स्टेबल विशाल दिलीप सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिंदखेडा तालुक्यातील वरपाडा येथील तक्रारदार तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला असताना त्याच वेळी १०० ते १५० लोकांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला. ठाणे अंमलदाराच्या कक्षात असलेल्या सुरेश भिवसन रामेश्वर या व्यक्तीला आमच्या ताब्यात द्या, तुम्ही कोणतीही कारवाई करू नका असे सांगून त्यांनी हुज्जत घातली. याच वेळी पोलीस ठाण्यावर दगड विटांचा मारा केला. सरकारी वाहनाचे नुकसान केले. म्हणून विशाल देवा ठाकरे,महेंद्र सुखदेव सोनवणे , जितेंद्र तुकाराम मालाचे , अंबर सुरसिंग मोरे , लखन उखा ठाकरे, गोरख रवींद्र मालचे, कैलास सुक्राम पवार यांच्यासह १०० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामकाजात हस्तक्षेप करण्याच्या भादंवि कलम ३५३ सह १४३,१४७,१४८,१४९,४२७,३३७, तसेच सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १८४चे कलम ३ प्रमाणे शिंदखेडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. शिंदखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, सहायक निरीक्षक विजय ठाकूर, उपनिरीक्षक मिलिंद पवार , दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक निलेश मोरे यांनी घटनास्थळी हजर राहून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top