मी काही आक्षेपार्ह्य बोललेच नाही – खा.शोभाताई बच्छाव यांचे स्पष्टीकरण.
धुळ्याच्या खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते आहे. मालेगाव मधील एक गुरांच्या व्यापाऱ्याने थेट संपर्क साधून पोलिसांनी पकडलेली आपली गुरे सोडवून देण्याची मागणी केली आहे. यावरून सोशल मीडियावर टीकेचे लक्ष ठरलेल्या खासदार.डॉ. शोभाताई बच्छाव यांनी आपले म्हणणे व्यक्त केले असून त्या म्हणाल्या,’ लोकप्रतिनिधी म्हणून मतदार संघातील जनतेच्या समस्या सोडवणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आलेले कॉल उचलणे हे ही क्रमप्राप्त आहे. मालेगाव मधून आलेल्या कॉलवर बोलणारा व्यक्ती नेमकी कोणती समस्या सांगतो आहे हेच आपल्याला कळत नव्हते. कॉटन मार्केट मध्ये माल आहे असे तो व्यक्ती सांगत होता. त्यामुळे आपण त्याला कोणता माल, कसला माल, कुणी पकडला, या बाबत विचारणा केली. तरीही प्रश्न न कळल्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलते असे सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्नांची सोडवणूक करून घेताना संबंधित अधिकाऱ्यांनाच सांगावे लागेल,’ असे ही खा.डॉ. बच्छाव म्हणाल्या.
राहिला प्रश्न सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल होण्याचा तर हे असे प्रकार करणारे कोण ? त्यांचे हेतू काय? हे सगळ्यांना माहित आहे. या बाबत मी भाष्य करणार नाही असे ही त्यांनी सांगितले…