सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या तळोदा तालुक्यातील कुलीडाबर गावाला जोडणारा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले होते.
तळोदा तालुक्यातील कुलीडाबर हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले अतिदुर्गम भागातील सुमारे 300 लोकसंख्या असणारे गाव आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील या गावाला जोडणारा पक्का रस्ता अद्याप पर्यंत नव्हता.त्यामुळे या गावातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी मोठा संघर्ष करावा लागत होता.गावात जाण्यासाठी तब्बल चार ते पाच किलोमीटर पायपीट करून जावे लागत होते. रस्ता नसल्याने या गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
या गावात रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः याबाबत लक्ष घालून रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले असून यासाठी 13 लाख 44 हजार 434 रुपये इतका निधी मंजूर झाला करण्यात आला.कुलीडाबर या गावाला जोडणारा रस्ता मंजूर झाला असून केवलापाणी ते कुलीडाबर,पालाबार यांना जोडणाऱ्या रस्त्याचे मातीकाम करण्यात येत होते. मातीकाम का असेना, पण गावाला जोडणारा रस्ता तयार होणार असल्याने ग्रामस्थांनी सुटकेच्या निश्वास सोडला.
मात्र,पहिल्याच पावसाळ्यात हा रस्ता वाहून गेल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस व पाण्याच्या तीव्र प्रवाह यामुळे रस्ता पूर्णपणे खोदला गेलेला आहे. रस्त्यावर पायी चालणे जिकरीचे झाले असून सर्वत्र दगड गोटे देखील पसरले आहेत अशा परिस्थितीत देखील सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांनी गावाकडे अडकलेल्या आपली मोटरसायकल पक्या रस्त्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी त्यांना मोठे तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले.
रस्ता पूर्णपणे वाहून गेल्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात या गावापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणींच्या सामना करावा लागणार आहे. दरम्यान या गावाला जोडणारा बारमाही पक्का रस्ता निर्माण करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे रस्त्या अभावी या गावात कोणतेही मोठे वाहन पोहोचत नसून त्यामुळे या गावातील पाणी प्रश्न व इतर प्रश्न देखील जटील बनले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा