वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यातल्या नवा तोरणमाळच्या बुरमेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे उडून जावून इमारतीची पडझड झाल्याने विद्यार्थ्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शाळेचे पत्रे उडून जवळपास पंधरा दिवस उलटत आले असले तरी याबाबत इमारत पाहणीला शिक्षण विभागाचे कोणीही इकड फिरकलेच नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु असल्याचे चित्र आहे.
राज्यातले क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळची ओळख. याच खोऱयातील शाळाबाह्य मुलांची संख्या पाहुन शासनाने याठिकाणी निवासी आंतराष्ट्रीय शाळा सुरु केली. मात्र काहीच महिन्यापुर्वी शाळेत शिक्षकांसह विद्यार्थीच गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. तोच आता शाळा उघडत नाही तर तोरणमाळच्या बुरमेपाडा शाळेची वादळी पावसाने पडझड झाली आहे. वाऱयामुळे शाळेचे पत्रेच उडून गेल्याने विद्यार्थ्यासमोर मोठी अड़चण निर्माण झाली आहे. या शाळेत पन्नासहुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. लोकसभा निवडणूकीसाठी याठिकाणी मतदान केंद्र असल्यानं शाळेची डागडूजी आणि दुरुस्ती देखील करण्यात आली होती. मात्र एकाच पावसात हवेच्या वेगाने उडून गेलेल्या पत्र्यांनी या कामाची पोलखोल झाली आहे. शाळेची पत्रे उडून जवळपास पंधरा दिवस उलटत आली असली तरी तिच्या दुरूस्तीबाबत शिक्षण विभागाचे मात्र दुर्लक्षच आहे. या शाळा पाहणीला कोणी बडा अधिकारी देखील फिरकला नसल्याने परिसरातील नागरीक याबाबत नाराजी व्यक्त करत आहे.
प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार,झेप मराठी शहादा