माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल

धुळे : माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, त्यांचे बंधू डॉ. रवींद्र देशमुख , अमित पाटील यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दोंडाईचातील एकावर प्राणघातक हल्ला झाल्याने त्यांनी हा गुन्हा दाखल केला असून संस्थेतील जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
प्रदीप कुमार भुजंगराव शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांची पत्नी वैशाली यांनी संस्थेविरुद्ध यापूर्वी तक्रारी दाखल केल्या आहेत. श्री. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या पी.बी. बागल कला व वाणिज्य महाविद्यालय, दोंडाईचा या संस्थेंतील कार्यालयीन अधीक्षक हे पत्नी वैशाली हिच्या मराठी विषय शिक्षक म्हणून नियुक्तीस अडथळा निर्माण करीत आहेत. या संदर्भात संस्थाचालकांविरुद्धची याचिका न्यायप्रविष्ट आहे. शिक्षण विभाग व पोलीस विभागात ही या बाबत तक्रारी केल्या आहेत. या याचिका आणि तक्रारी मागे घ्याव्यात म्हणून आपल्यावर हल्ला झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दि. ३० जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्लॉट घेण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने फोन करून आपल्याला बोलवले. त्यामुळे मांडळ शिवारातील धुळे रोड वरील कर्मयोगी नगर येथील प्लॉटिंगच्या जागेवर उभे असताना सात ते आठ जणांनी आपल्यावर हल्ला चढवला. संस्था चालक डॉ. हेमंत देशमुख , रवींद्र देशमुख , अमित पाटील , प्रतीक देशमुख आणि संस्थेचे कामकाज पाहणारे धनराज चौधरी यांनी कटकारस्थान रचून आपल्यावर हा हल्ला घडवून आणला यात डोक्याला, पायावर, पाठीवर, जबर मारहाण झाली असून या झटापटीत त्यांच्यासह खाली पडलेला पत्नी वैशाली हीच मोबाईल घेऊन हल्लेखोर पळून गेले असे नमूद केले आहे. या तक्रारीवरून वरील ५ जणांसह १३ जणांविरुद्ध भादंवि ३०७,१२० ब , १४३,१४७,१४८,१४९, ३२३,३२४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय सी.बी. हंडाळ हे करत आहेत.

तक्रारदार प्रदीप शिंदे मनोरुग्ण – डॉ. देशमुख

प्रदीप शिंदे यांनी माझ्यासह पाच जणांवर त्यांना जीवे मारण्याचा कट करून त्यांच्यावर मारेकरी घातले अशी तक्रार दिनांक 3 /7/ 2024 रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशन वर केली आहे.
प्रदीप शिंदे हे निराशेचे आत्महत्येचे मानसिक झटके येणारे जुने मनोरुग्ण आहेत. आमचे त्यांच्याशी कसलीही वाद नाहीत. ते आमचे भाचे आहेत त्यांना व त्यांच्या पत्नीला सेवा मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत.
त्यांच्या खाजगी आयुष्याची आम्हाला माहिती नाही. त्यांच्यावर हल्ला झाला असेलच तर त्यांचे कारण पोलिसांना त्यांच्या जीवनात शोधावे लागेल. अशी प्रतिक्रिया डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares