महायुती प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलची पत्रकार परिषद
धुळे – खरेदी विक्री संघाच्या मोक्याच्या जागा विकून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या जवाहर गटाच्या हाती पुन्हा सत्ता देणार का? असा थेट सवाल
करीत शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलच्या हाती धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीची सत्ता द्या, असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले.
शेतकरी सेवा विकास पॅनलच्या वतीने प्रा. अरविंद जाधव, बाळासाहेब भदाणे, राम भदाणे, अशोक सुडके देवेंद्र पाटील, आशुतोष पाटील या नेतेमंडळींनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या संदर्भात प्रा.अरविंद जाधव यांनी जवाहर गटावर खरेदी विक्री संघ सोसायटीत भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेत. सहकार क्षेत्रात जवाहर गटाने सुरू केलेले आणि निर्माण केलेले सर्व प्रकल्प, उद्योग उभे राहण्याआधीच रसातळाला गेले. जवाहर गटाने जिल्ह्यात सहकाराची अक्षरशा वाट लावली. अनेक भूखंड विकून स्वतःचा फायदा केला. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील भूखंड 99 आर ही जमीन बीओटी तत्त्वावर ठेकेदाराला दिली. यातून वीस ते पंचवीस कोटींचा मलिदा लाटल्याचा आरोपही प्रा. जाधव यांनी केला. राम भदाणे यांनी देखील अनेक उदाहरणे देऊन जवाहर गटावर भ्रष्टाचाराचे ताशेरे ओढले. जवाहर गटाने व्यक्तिशः सभासद म्हणून मर्जीतल्या माणसांनाच सहकारी संस्थांमध्ये सभासदत्व दिले. या माध्यमातून सहकारी संस्था आपल्या ताब्यात घेऊन मनमानी कारभार केला. आपला प्रभाव असलेल्या गावांमधील लोकांना सभासदत्व देऊन व्यक्तिशः सभासद संख्या आपल्या फायद्याच्या दृष्टीने नोंदवली. मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये सभासद वाढू दिले नाहीत किंवा नोंदवून घेतले नाहीत. सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्थां मधून आर्थिक गैरव्यवहार करीत सहकाराचा स्वाहाकार केला. याच प्रकारे खरेदी विक्री संघाला देखील जवाहर गटानेच अवकळा आणली. त्यामुळे धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळे च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत पॅनल असलेल्या शेतकरी सेवा विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या. शेतकरी सेवा विकास पॅनल धुळे तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना, शेतमालाला योग्य आणि रास्त भाव व प्राधान्याने फक्त शेतकऱ्यांचा शेतमाल मोजणी व्हावा यासाठी कटिबद्ध असेल. शेतकऱ्यांसाठी आम्ही न्याय व हक्कांसाठी लढत असलेल्या लढाईत मतदारांनी आम्हाला साथ द्या आणि भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे पाईक व्हा, असं आवाहनही शेतकरी सेवा विकास पॅनलच्या नेतेमंडळींनी या पत्रकार परिषदेत केले.