सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.संजीव गिरासे

धुळे : उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या बाविसाव्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथे एकदिवसीय राज्यस्तरीय बाविसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी खानदेशातील कथा, कादंबरीकार व आदिशक्ती धनदाईमाता शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली.

यापूर्वी प्रा डॉ. द. ता. भोसले, प्रा. डॉ. तारा भवाळकर, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, वामन होवाळ, प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, महाकवी सुधाकर गायधनी, रा. रं. बोराडे, लक्ष्मण गायकवाड, रेखा बैजल, प्रा. डॉ. यशवंत पाठक, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. संगीता बर्वे, वसंत आबाजी डहाके, प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. डॉ. सदानंद मोरे, प्रा. डॉ. म. सु. पगारे, अशोक कोतवाल, माया दिलीप धुप्पड, लक्ष्मीकांत देशमुख, बी. जी. वाघ, प्रदीप निफाडकर या दिग्गजांनी सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. संमेलन यशस्वितेसाठी शहराध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव डी. बी. महाजन, गायत्री पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण लोहार, उपाध्यक्ष विनोद निळे प्रयत्नशील असून, संमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. संजीव गिरासे यांना ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अॅन्ड एज्युकेशन ग्रोथ नवी दिल्लीचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. डॉ. गिरासे यांच्या नावावर आजमितीस बारा ग्रंथ प्रकाशित असून, त्यात कथासंग्रह, ललितलेख संग्रह, कादंबरी यांचा समावेश आहे. विद्यापीठात व महाराष्ट्र राज्य शिक्षण यांच्या अभ्यासक्रमात त्यांचे प्रथम वर्ष, नववी, दहावीच्या वर्गाला कथासंग्रह, लघुकथा अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. एम.ए. (मराठी) अभ्यासक्रमाला दोन पुस्तकांचा समावेश आहे. साडेतीन हजारांच्या वर त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झालेले आहेत. सर्वोदय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या निवडीबद्दल आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार देवरे, उपाध्यक्ष आर. एम. देवरे, सचिव डॉ. संजीवनी देवरे, खजिनदार डॉ. सुजाता सोनवणे तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top