मी नेहमी पुढील  30 वर्षांनंतरचा विचार करुन काम करतो- आ. अमरिशभाई पटेल

शिरपूर तालुक्यात सर्वत्र हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करणार

शिरपूर : शिरपूर तालुक्यात जिथे योग्य जागा उपलब्ध असेल तिथे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड वर भर द्या, वृक्ष तोड करु नका. आम्ही हजारो, लाखो वृक्ष लागवड आतापर्यंत करुन जगवली. भूपेशभाई पटेल यांनी नागेश्वर, असली येथे महावृक्षारोपण करुन हजारोच्या संख्येने वृक्ष लागवड करत आहेत. प्रत्येकाने आपापल्या गावात, आपल्या भागात वृक्ष लागवड करा. नुसतेच वृक्ष लागवड न करता वृक्ष संवर्धन, जोपासना करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. मी नेहमी पुढील  30 वर्षांनंतरचा विचार करुन काम करतो. एस.व्ही.के.एम. मार्फत आपण करवंद येथे हा प्रोजेक्ट राबवतोय. शिरपूर तालुक्यासाठी पर्यावरण पूरक “ड्रीम प्रोजेक्ट” पूर्ण करुन करवंद येथील 62 एकर वनक्षेत्र हिरवाईने नटणार आहे. तालुक्यातील जनतेने मुलामुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. आपण सर्व सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत, त्याचा लाभ घ्या. शिरपूर पॅटर्न राबवून 400 बंधारे बांधून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतोय. तालुक्यातील जमिनीत थेंबनथेंब पाणी मुरवतोय. 1 हजार बेडचे हॉस्पिटल कार्य सुरु असून लवकरच 300 बेडचे हॉस्पिटल सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सुरू करत आहोत.
आम्ही आमचे जीवन तालुक्यासाठी व्यतीत करतोय. आमच्या विचाराने चला, अपप्रचाराला बळी पडू नका.
शासन, प्रशासन देखील आपल्या सोबत आहे. जिल्हा प्रशासनाच्या 50 लाख वृक्ष लागवड मोहिमेला पुढे न्या. शिरपूर तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ मधून सर्व लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अनेक कार्यात भूपेशभाई पटेल यांची प्रेरणा खूप महत्त्वाची आहे. शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक विचारासह जनतेने सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.
करवंद येथील गोरक्षनाथ मंदिर परिसरात 5 जुलै रोजी उप-वनसंरक्षक (आदिवासी) धुळे वनविभाग, श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई व मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व संयुक्त करार अंतर्गत वृक्ष लागवड, संवर्धन व जोपासना कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, धुळे जि.प. सीईओ विशाल नरवाडे, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत ढिवरे, धुळे उपवन संरक्षक नितीनकुमार सिंग, ट्रेनी जिल्हाधिकारी डी. सर्वानंद, धुळे जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, उप विभागीय अधिकारी शरद मंडलिक, डीवायएसपी के. के. पाटील, डेप्युटी सीईओ गणेश मोरे, बीडीओ संजय सोनवणे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, मनिषा देवेंद्र पाटील, सरपंच हिरामण हुला भिल, मनिषा निकम, श्रीमती पी.आर.पाटील, सुभाष कुलकर्णी व अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली सर्वत्र वृक्ष व पर्यावरण संरक्षण शिरपूर तालुक्यात प्रत्यक्षात दिसते याचा आम्हाला आनंद आहे. वन विभाग व एस..व्ही.के.एम., मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त करार हा खूपच प्रेरणादायी व अभिनय उपक्रम आहे. करवंद गावात 25 हजार व शिरपूर तालुक्यात नागेश्वर व असली या अनेक ठिकाणी वृक्ष लागवड कौतुकाचा विषय आहे. धुळे जिल्ह्यात 50 लाख वृक्ष लागवड लक्ष्य ठेवले असून प्रत्येकाने 2 झाडे लावा.  नागरिकांनी पुढे यावे. इतर तालुक्यातून सरपंच, पदाधिकारी यांना करवंद भेट घालून अभ्यास दौरा करु या. सर्वच गांव परिसर हिरवेगार करु या. हरित पंचायत, माझी वसुंधरा स्पर्धेत सहभागी व्हा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनवगोयल यांनी केले.
धुळे उपवन संरक्षक नितीनकुमार सिंग यांनी अमरिशभाई पटेल यांचे विशेष आभार मानले. नागरिकांनी वन विभाग मोहिमेत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. जि.प. सीईओ विशाल नरवाडे म्हणाले, वृक्ष लागवड संवर्धन, जोपासना कार्यक्रम रुपरेषा पाहून आनंद झाला. प्राण वायूची सर्वत्र खूप गरज असतांना अमरिशभाई हे या कार्यसाठी प्रेरणा ठरले आहेत. सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी आम्ही प्रशासन देखील प्रयत्नशील आहोत.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी वृक्षारोपण मोहिमेसाठी आमदार अमरिशभाई पटेल व वन विभागाचे विशेष आभार मानून 25 हजार वृक्ष लागवडीची मोहीम पूर्णपणे यशस्वी करणार असल्याचे आश्वासन दिले. संपूर्ण वनक्षेत्र वनराईने समृद्ध करण्यात येत असून शिरपूर तालुका पर्यावरणाच्या दृष्टीने मोठे केंद्र तयार होत आहे. पटेल परिवार शिरपूर तालुक्यासाठी राबवत असलेल्या नवनवीन प्रकल्पांबाबत शिरपूर तालुक्यातील जनता समाधान व्यक्त करत आहे.
प्रास्ताविक मधुकर अहिरे यांनी, सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले. आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी मनिषा निकम यांनी मानले.
मनिषा निकम यांनी भाईंच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी।करणार असल्याचे सांगून भूपेशभाई फ्रेंड सर्कल, आमदार कार्यालयाचे नियोजन पूर्वक सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला शिरपूर शहर व तालुक्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares