खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी दिल्यात सूचना, जिल्ह्यातील विविध विकास कामांवर झाली चर्चा
धुळे – लोकसभा निवडणूक संपली आणि आता खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी कामाला सुरुवात केलीय. ६ जुलै ला जिल्ह्यातील विकास कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. मात्र विषय शहरासह जिल्ह्याच्या विकासाचा असताना या बैठकीला आ. फारूक शहा, आ. जयकुमार रावल यांनी दांडी मारली. शिवसेनेसह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
धुळे शहरातील व जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देवून ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिल्यात.
धुळे शहरातील व जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी सर्वांनंद डी., निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, सुलवाडे-जामफळ योजनेचे कार्यकारी अभियंता अमरदिप पाटील, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
खासदार डॉ.बच्छाव म्हणाल्या की, यंदा चांगले पर्जन्यमान झाल्यास धुळे शहराला नियमित पाणीपाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे. महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने करावीत. शहरातील अतिक्रमण काढण्यात यावेत. तसेच धुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घंटागाडी तसेच सफाईकामगारची भरती करावी. शहरात मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करावी, इंदोर मनमाड रेल्वे संदर्भात अद्ययावत माहिती द्यावी. राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात यावेत त्याचबरोबर सिंचनाच्या योजनावर जास्तीत जास्त भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
बैठकीत धुळे शहरात 8 दिवसांनी होणारा पाणीपुरवठा दररोज व नियमित करणेकामी उपाययोजना कराव्यात, धुळे महानगरपालिका अंतर्गत रस्ते नूतनीकरण, पावसाळ्यापूर्वी गटारी स्वच्छ करणे, भूमिगत गटार, नदी स्वच्छता व घाट बांधणे, शहर स्वच्छता, शहरातील अतिक्रमण, शहरातील वाहतुक नियोजन, इंदोर मनमाड रेल्वे मार्ग कामाचा आढावा, सुलवाडे-जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, धुळे शहर एम. आय. डी. सी.चे विस्तारीकरण व एम.आय.डी.सी. अंतर्गत येणाऱ्या विविध अडचणी सोडविणे. मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरीडॉर अंतर्गत नरडाणा एम.आय.डी.सी. चे कामकाज तसेच प्रलंबित प्रश्नांवर चर्चा, औद्योगिक कॉरीडॉरचा विकासासाठी केन्द्र शासनाकडे निधी मागणी, धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा, नवीन रस्ते, आदिवासी वस्ती/दलित वस्ती विकास योजना प्रकल्प राबविणे, अल्पसंख्यांक समाज बांधवाच्या विविध अडचणीबाबत व शैक्षणिक विकासाबाबत चालू असलेले कामे / प्रलंबित कामे/ नियोजित कामे, बोरविहिर ते नरडाणा रेल्वे मार्गावरील जमिन अधिग्रहण, जमिन अधिग्रहणात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढीव दर मिळणे, गोराणे/माळीच एम.आय.डी.सी. जमिनीचे दर निश्चित करणे, अक्कलपाडा धरणातून हगरा नाल्यात पाणी सोडणेबाबत. विखरण धरणात पाणीसाठी उपलब्ध होणेबाबत उपाययोजना, पिक विमा योजना, वाडी शेवाडी धरणाचा उजवा कालव्याचे निम्या धरणापर्यंत पाटचारी वाढविण्याबाबत या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ात सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत व संबंधित विषयाची माहिती दिली. बैठकीस माजी आमदार शरद पाटील यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.