तात्पुरत्या सोयीसाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याचे आयुक्तांचे निर्देश
धुळे : शहरातील वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरातील रहिवाशांनी महापालिकेच्या आयुक्त अमिता पाटील यांच्या दरबारात रस्त्याच्या समस्येविषयी व्यथा मांडली. यावेळी आयुक्त पाटील यांनी सहाय्यक अभियंता यांना रहिवाशांची पावसाळ्यात तात्पुरती सोय होण्यासाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याची निर्देश दिले.
वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरात पावसामुळे नागरिकांना रहदारीसाठी रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. संपूर्ण रस्ता चिखलाने माखलेला असल्याने रस्त्यात चिखल की चिखलाता रस्ता अशी स्थिती आहे. वलवाडी शिवाराचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर कॉलनी परिसरात नवीन भूमिगत गटारी आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जाणे अपेक्षित होते. परंतु, ना भूमीगत गटारी झाल्या; ना सिमेंट काँक्रीटचे रस्ते झालेले आहेत. वलवाडी शिवारातील तिरुपती नगरात रस्ता तयार करावा ही नागरिकांची जुनी मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर पूर्णपणे चिखल झाला आहे. त्यातच गेल्या महिन्यात टाकण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. रस्त्यावरून वाहन चालवणे दूरच नीटपणे पायी चालणे कठीण आहे. पावसाळ्यात तिरुपती नगरातील नागरिकांना अक्षरशः चिखलातून मार्ग शोधावा लागत आहे. चिखलात नागरिकांची वाहने रुतून हाल होत आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांना घरापासून लांब अंतरावर आपली वाहने उभी करावी लागत आहेत. ही समस्या सुटावी यासाठी तिरुपती नगरातील रहिवाशांनी सोमवारी महापालिकेचे आयुक्त अमिता पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. सर्वे नंबर १६९/१/२ मध्ये असलेल्या तिरुपती नगरत नवीन सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्त्यानभावी दळणवळणासाठी मोठी अडचण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन नवीन रस्ते तयार करणेत यावे. अन्यथा सर्व तिरुपती नगर रहिवासी महानगर पालिके समोर आंदोलन करतील असा इशाराही नागरिकांनी दिला.
तिरुपती नगरातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर महापालिकेच्या आयुक्त अमिता पाटील यांनी पावसाळ्यात नागरिकांची तात्पुरती सोय व्हावी, यासाठी रस्त्यावर खडी आणि मुरूम टाकण्यात यावा, असे निर्देश सहाय्यक अभियंता चंद्रकांत ओगले यांना दिले. रस्त्याच्या विषय महापालिकेच्या येत्या महासभेत पटलावर घेऊन सोडवण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त पाटील यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी किशोर नेरकर, सचिन सनेर, प्रवीण बोराडे, अभिजित पांचाभाई, धनराज पवार, राजेंद्र वानखेडे, किशोर देसले, अनिल पाटील, नंदूलाल पाटील, विजय महाले, दिलीप पाटील, अमित सांगळे, दिलीप चौधरी, समाधान अवसरमल, भूपेंद्र देसाई, दत्त भोई, दिनकर शिंदे, विजय शिंदे, निखिल सोनार, सुरेश सूर्यवंशी, खेमचंद पाकळे, शांताराम पाटील, पंकज जयस्वाल, जितेंद्र महाले, स्वप्नील पवार, गोपलसिंग राजपूत, अंबादास कुलकर्णी, प्रसाद अहिरे, केशव चौधरी, सुरेश चौधरी, सतीश पवार आदी उपस्थित होते.