अक्कलपाडा 100 टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहणनिधीची तत्काळ व्यवस्था करावी – आ.कुणाल पाटील

अक्कलपाडा संघर्ष समितीच्या आंदोलनाचे विधानभवनात पडसाद

धुळे – धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 198 हेक्टर अतिरिक्त भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणार्‍या जमीन अधिग्रहणाकरीता शेतकर्‍यांना मोबदला म्हणून सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांची आवश्यता आहे. आज हे धरण केवळ 60 टक्केच भरले जात आहे. म्हणून अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहणाकरीता लागणार्‍या निधीची शासनाने तत्काळ तरतूद करावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी आज विधानभवनात केली. दरम्यान अक्कलपाडा संघर्ष समितीने केलेल्या रास्ता रोको आंदोलनाचे पडसाद आज विधीमंडळात उमटले असून संघर्ष समितीच्या विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे. अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरावे आणि अक्कलपाडा संघर्ष समितीच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात या मागणीसाठी आ.कुणाल पाटील यांनी आज दि.9 जुलै रोजी अधिवेशनात आवाज उठविला. अतिमहत्वाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करतांना आ.कुणाल पाटील यांनी विधानभवनात सांगितले कि, अक्कलपाडा धरणाचे बांधकाम आज पूर्णपणे झाले आहे. परंतु हे धरण फक्त 60 टक्केच भरले जात आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सुमारे 198 हेक्टर अतिरिक्त जमीन अधिग्रहणाची गरज आहे. त्यासाठी संपादित होणार्‍या जमीनीचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यासाठी सुमारे 200 ते 250 कोटी रुपये निधीची गरज आहे. हा निधी सरकारने दिला नाही म्हणून आज अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरले जात नाही असे आ.पाटील यांनी सांगितले. यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी पुढे स्पष्ट केले कि, आज विधानभवनात पालकमंत्री ना. गिरीष महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील हे सभागृहात उपस्थित आहेत. मागे जलसंपदा विभाग व पाणी पुरवठा खाते यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. बैठकित जलसंपदा विभागाने सांगितले होते कि, उर्वरीत 40 टक्के धरण भरणेसाठी लागणार्‍या जमीन अधिग्रहणाकरीता पाणी पुरवठा खात्याने 200 ते 250 कोटी रुपये द्यावेत आणि तशी मान्यताही या बैठकित देण्यात आली होती. मात्र अजुनही त्या निधीची तरतूद केलेली नाही. परिणामी अक्कलपाडा धरण हे आज पूर्ण क्षमतेने भरले जात नाही. म्हणून शासनाने तत्काळ या या निधीची तरतूद करावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी अधिवेशनात बोलतांना केली.

अक्कलपाडा संघर्ष समितीच्या मागण्या

आज महाराष्ट्र विधानभवनात अक्कलपाडा संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटले. नेर ता.धुळे येथे विविध मागण्यांसाठी अक्कलपाडा संघर्ष समितीच्यावतीने शेतकर्‍यांनी दि.8 जूलै रोजी महामार्ग क्र.6 वर रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनकर्त्यांचा आवाज आ.कुणाल पाटील यांनी विधानभवनात बुलंद केला. त्यांनी यावेळी सांगितले कि, धुळे ग्रामीण मतदार संघात अक्कलपाडा संघर्ष समितीने फार मोठे आंदोलन केले. अक्कलपाडा धरण शंभर टक्के क्षमतेने भरावे या मागणीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होते. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष असून संघर्ष समितीच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी विधानभवनात केली.

अग्रवालांची परवानगी रद्द करा

अक्कलपाडा धरणावरुन शिरधाणे ता.धुळे येथील शिवारात औद्योगिक वापराकरीता पाणी उचलण्याची परवानगी अनमोल अग्रवाल नामक व्यक्तीने घेतली आहे. मात्र त्या ठिकाणी सदर व्यक्ती इंडस्ट्री उभी न करता आज तो व्यक्ती तेथे शेती करीत आहे. त्यामुळे त्याचा पाणी वापर हक्क रद्द करावा अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी अधिवेशनात बोलतांना केली. दरम्यान यावेळी आ.पाटील यांनी जलसंपदा मंत्री .गिरीष महाजन यांच्याकडून खुलासाही मागीतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares