दोंडाईचा – शहरातील मोनाली हॉटेल पासून ते केशरानंद पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुन्हा सुरू आहे. विशेष म्हणजे पालिकेपासून अवघ्या काही अंतरावर सुरु असलेल्या या कामाबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहितीच नाही. मग संबंधित ठेकेदार कोणाच्या पाठबळावर एवढी हिम्मत करतोय कि अधिकारी त्याला पाठीशी घालताय, असा प्रश्न अनेकांना पडलाय.

पावसाळ्यात रस्त्यांचे डांबरीकरण करू नये असा शासन निर्णय आहे.त्यामुळे जून महिना सुरू झाल्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम केले जात नाही. मात्र या शासन निर्णयाला फाटा देऊन दोंडाईचा आतील ठेकेदाराने पावसाळ्यात रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे. सामान्य नागरिकांनाही हे काम खटकले, त्यामुळे याबाबत सोशल मीडियावर तक्रारी बरीच टीका झाली. अनेकांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या कामाचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले. या संदर्भात उलट सुलट टीका टिप्पणी देखील झाली. ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम करणारे कोणते तंत्र संबंधित ठेकेदाराने शोधून काढले.? याबाबतही चर्चा झाली. म्हणून ठेकेदाराने काम बंद केले खरे, पण आता परत काम सुरु केले आहे. खरंतर पावसामुळे डांबरीकरणाचे काम टिकत नाही हे माहीत असताना देखील हे काम का केले जाते केवळ पैसे लाटण्यासाठी काम होते आहे काय ? संबंधित ठेकेदार कोणाच्या बळावर एवढी हिंमत करतोय? या कामातून आणखी इतर कोणी टक्केवारीचे वाटेकरी आहेत काय असे एक ना अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी याना विचारले असता त्यांना या कामाबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तपास करून सांगतो, असे ते म्हणाले. तहसीलदार संभाजी पाटील हे सध्या पालिकेवर प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. अधिकाऱ्यांचेही न ऐकणाऱ्या अशा ठेकेदारांची कारवाई करण्याची मागणी होते आहे.
प्रतिनिधी समाधान ठाकरे, दोंडाईचा