शिंदखेडा – तालुक्यातील चिमठाणे गावात गेल्या 3 वर्षांपासून दलित आदिवासी वस्तीमध्ये ना गटारीचे कामे करण्यात आली, ना रस्त्यांची, त्यामुळे चिमठाणे गावातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले आहेत. तीन वर्षापासून चिमठाणे ग्रामस्थ सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे यांच्याकडे गटारी व रस्त्यांच्या मूलभूत प्रश्न करिता मागणी करीत आहे, मात्र सरपंच आणि त्यांचे पती व पुत्र या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
चिमठाणे गावाच्या सरपंच छोट्याबाई दरबार सिंग गिरासे या तीन वर्षांपूर्वी गावाच्या सरपंच पदी विराजमान झाले मात्र गावाचा कारभार शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा व चहाचे दुकान चालत असलेले त्यांचे पती दरबार सिंग गिरासे हेच बघतात. म्हणून नागरिक आपल्या समस्या घेऊन सरपंच पदी दरबार सिंग गिरासे यांच्याकडे जातात मात्र नागरिकांच्या कुठल्याच समस्या हे सोडवत नसल्यामुळे नागरिक चांगले हैराण आले आहेत. आता ऐन पावसाळ्यात गावातील पाणी हे दलित वस्तीमध्ये शिरत असते त्यामुळे गटारी आणि रस्ते नसल्यामुळे हे पाणी तुंबते आणि याच तुंबलेल्या पाण्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
गटारी, रस्ते नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल
गावातील सांडपाणी हे गावातील वस्तीमध्ये साचल्यामुळे या साचलेल्या पाण्यामध्ये डुकर आणि इतर प्राणी यांच्यामुळे दुर्गंधी पसरत आहे तसेच डास मच्छरांमुळे नागरिकांचे व लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आता तरी सरपंचानी ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.