ठेकेदारांच्या मनमानीवर वचक कुणाचा ?
दोंडाईचा । प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा येथे बाम्हणे रेल्वे गेट नजीक उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने सर्व्हिस रोड अतिशय खराब झाला आहे.. या रस्त्यावर वाहन चालवणे तर अशक्यच आहे… पायी चालणे देखील अवघड बनले आहे. ठेकेदार लक्ष देण्यास तयार नाही, अशी वाहनधारकांची तक्रार आहे. मागच्या वर्षी याच रस्त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. उन्हाळ्यात देखील अतिशय मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असते. तेच प्रदूषण बनून नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर प्रश्न बनत आहेत. या रस्त्यावर रोजच छोटे मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून सध्या त्यात पावसाचे पाणी खाचले आहे. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्वरित रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होते आहे. एकीकडे भर पावसात रस्त्यांचे डांबरीकरण होते, तर दुसरीकडे खड्ड्यामुळे रस्त्यांची चाळण झाली असताना, त्याकडे लक्ष दिले जात नाही, याचा अर्थ ठेकेदारांवर कोणाचाच वचक नाही का ? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
प्रतिनिधी – समाधान ठाकरे