सरकार पक्षातर्फे ॲड.अजय सानप यांनी केलेला युक्तिवाद व साक्ष ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर यांनी दिली शिक्षा
धुळे – तालुक्यातील वार गावातील खुनाच्या घटनेत दि.१९ मार्च २०२१ रोजी सकाळी १०:३० ते ११:३० च्या दरम्यान आरोपी ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याने आत्माराम हिरामण पारधी (वय. ७० वर्षे) रा.वार ता. जि.धुळे यांच्या डोक्यावर, हातावर, बोटावर बोकड कापण्याचे सुऱ्याने वार करुन त्यांचा निर्घृणपणे खुन केला. म्हणून आरोपी ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याचेविरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला धुळे जिल्हा न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश-५ न्या.डी. एम.आहेर यांच्या कोर्टात सुरू होता. सदर केस मध्ये आरोपी यास न्या.आहेर यांनी जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
१९ मार्च २०२१ रोजी सकाळी १०:३०ते ११:०० वाजेच्या दरम्यान वार ता.जि.धुळे या गावात पारधी वाड्यातील कालिका देवी मंदीरात आरोपी ज्ञानेश्वर दगडु पवार (पारधी) वय-३५ वर्षे रा. वार ता. जि.धुळे याने त्याचे आजोबा भाईदास उखडू पारधी यांच्या सन २००६ मध्ये झालेल्या खुनामागे सदर घटनेतील फिर्यादी शांताराम आत्माराम पारधी यांचे वडील यातील मयत आत्माराम हिरामण पारधी यांचा हात होता, असा संशय मनात ठेवुन त्याचा घटनेचा बदला म्हणून आत्माराम हिरामण पारधी वय.७० वर्षे रा.वार ता. जि.धुळे यांचे डोक्यावर, हातावर, बोटावर बोकड कापण्याचे सुऱ्याने वार करुन त्यांचा निर्घृणपणे खुन केला. म्हणून यातील आरोपी ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याचेविरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे अपराध केल्याचा दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
सदर घटनेत खून करतेवेळी वापरलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले होते. कोर्टात सदर केस मधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व १० साक्षीदार, डॉक्टर, तपास अधिकारी आदी साक्षीदारांना तपासण्यात आले. वरील साक्षीदारांची महत्वपूर्ण साक्ष झाली. सदर घटनेकडे धुळे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून होते. वरील साक्षीदार व डॉक्टर, तपास अधिकारी यांची साक्ष व सरकार पक्षातर्फे ॲड.अजय सानप यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा न्यायाधीश डी. एम.आहेर यांनी आरोपी ज्ञानेश्वर दगडु पवार (पारधी) यास जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे ॲड.अजय सानप यांनी कामकाज पाहिले.