धुळे शहरातील नकाणे रोड परिसरात अज्ञात व्यक्तींनी एका तुरूंगाधिकाऱ्याच्या घरात चोरीचा प्रयत्न केला तर दुसऱ्या ठिकाणी दुचाकी चोरून नेल्याची घटना 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
धुळे शहरातील नकाणे रोडवरील माध्यमिक शिक्षण कॉलनीत प्लॉट नं. ३ मध्ये रहाणारे प्रभाकर पाटील यांचे घर तीन दिवसांपासून बंद अवस्थेत होते. ते नाशिक येथे तुरूंगाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी भारती प्रभाकर पाटील ग्रामसेविका असून त्या ट्रेनिंगनिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी ही संधी साधून प्रभाकर पाटील यांच्या घरातील दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. मात्र आतील दरवाजाची कडी न तुटल्याने चोरीचा प्रयत्न फसला असावा, अशी माहिती स्वतः घरमालक भारती प्रभाकर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.
दुसऱ्या घटनेत याच कॉलनीत रहाणारे सोमनाथ धर्मा बोरसे यांच्याकडेही चोरट्यांनी डाव साधला. त्यांच्या घरातील वॉलकंपाऊंडमध्ये लावलेली हिरो कंपनीची फॅशन प्रो (एम.एच. १८/ए.एन. ५८४३) गाडी वॉल कंपाऊंडचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी सोमनाथ धर्मा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.