धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना जर्मन देशात काम करण्याची सुवर्ण संधी;

इच्छुक युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

धुळे – जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळास जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग राज्यात रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. याबाबत जर्मन राज्यास कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत महाराष्ट्र शासन व बाडेन वुटेनबर्ग राज्य जर्मनी यांचे दरम्यान सामंजस्य करार झालेला आहे. या करारामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.मंजुषा क्षीरसागर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

केंद्र शासनाच्या परवानगीनंतर महाराष्ट्र शासन व बाडेन वुटेनबर्ग राज्य जर्मनी यांचे दरम्यान 25 फेब्रुवारी 2024 रोजी दोन्ही राज्यात सामंजस्य करार झाला आहे. या पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान 10 हजार कुशल मनुष्यबळ जर्मन राज्यास उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कुशल मनुष्यबळामध्ये तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, फिजिओथेरपी थेरपिस्ट आणि इतर पॅरामेडिकल तंत्रज्ञ तसेच वीजतंत्री, रंगारी, सुतार, नळजोडारी आणि इतर स्थापत्य सेवा यांना जर्मनीतील बाडेन- वुटेनबर्ग या राज्यात नोकरीची संधी उपलब्ध होतील. यासाठी कौशल्यवर्धन आणि जर्मन भाषेचे प्रशिक्षण महाराष्ट्रात विनामूल्य मिळणार आहे. त्यासाठी जर्मन भाषा शिकण्यासाठी गोथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यातही सामंजस्य करार झाला आहे.

धुळे जिल्हयातील विविध क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेले आणि जर्मनीत रोजगारानिमित्त जाऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्या डॉ.मंजुषा क्षीरसागर यांनी केले आहे.

जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांनी नोंदणी करावी

धुळे जिल्ह्यात जर्मन भाषा शिकण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे येथे केंद्र सुरू केले जाणार आहे. जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवक युवतींना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी जर्मन भाषेची अर्हता बीए इन जर्मन लँग्वेज, एम. ए. इन जर्मन लँग्वेज, गोथे इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय a1 a2 b1 b2 c1 c2 उत्तीर्ण असणाऱ्या प्रशिक्षीत शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमित शिक्षकांनी त्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी लिंक https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7 उपलब्ध करुन दिली आहे. तरी सदर संधीचा लाभ जास्तीत जास्त शिक्षकांनी घेण्याचे आवाहनही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.मंजुषा क्षीरसागर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares