संस्था चालकांनो, विद्यार्थ्यांच्या सुरक्षा पुरवा अन्यथा शाळांवर कठोर कारवाई

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा इशारा

धुळे, दिनांक 26 ऑगस्ट : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनाने प्रत्येक शाळेमध्ये सुरक्षाविषयक आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजना संदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमत भदाणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेंद्र सोनवणे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्रांचे सहायक आयुक्त राजु वाकुडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.पापळकर म्हणाले की, जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व मुख्याध्यापकांनी काळजी घ्यावी. शाळा, महाविद्यालय परिसरात दामिनी पथकाने नियमित व्हिजीट करावी. तसेच शाळेतील शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एक जागृत नागरिक म्हणून शाळेच्या परिसरात फिरणाऱ्या शाळाबाह्य मुलांची माहिती पोलीसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. शाळेत पालकांच्या नियमित बैठका घेण्यात याव्यात. शाळेतील प्रत्येक बाबींच्या जबाबदारीचे वाटप एका कर्मचाऱ्यावर करण्यात यावे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवाशी बसमध्ये बसविण्यात यावेत. शाळेतील विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच संदर्भात माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. प्रत्येक शाळेत सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. मुले, मुलींच्या वर्तणूकीवर शिक्षकांनी लक्ष ठेवावे. प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्यात यावीत. शाळेतील विशाखा समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना त्वरीत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

सर्व शाळांनी वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावेत. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या नियमित तपासणीसाठी पथक तयार करण्यात येणार असून तपासणीत काही गैर आढळून आल्यास शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खाजगी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक – नरवाडे

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले की, जिल्ह्यातील खाजगी व अनुदानित शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे एका महिन्याच्या आत लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेने शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करावी. शाळेत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची 24 तासांच्या आत माहिती शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावी. प्रत्येक शाळेत किमान एक महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी ओळखपत्र लावावेत. शाळेत येणाऱ्या अभ्यागतांचे व्हिजिट रजिष्टर अद्ययावत ठेवावेत. पालक व शिक्षकांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करुन त्यावर माहितीची देवाण घेवाण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

टवाळखोरांविरुद्ध कठोर कारवाई – धिवरे

जिल्हा पेालीस अधिक्षक श्री. धिवरे म्हणाले की, एक कॅमेरा समाजासाठी, पोलीस दादा, पोलीस दीदी संकल्पना येत्या काळात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून यापुढे शाळा, महाविद्यालय परिसरात दामिनी पथक अधिक गतीमान करणार असून टवाळखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाने प्रत्येक शाळेतील नियमित कर्मचारी सोबतच नवनियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करुन घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी सर्व मुख्याध्यापकांना दिल्यात.

शिक्षणाधिकारी श्री. पवार म्हणाले की, सर्व शाळांनी सर्व समित्यांची स्थापना त्वरीत करावी. शाळेत विद्यार्थ्याना ने-आण करणाऱ्या स्कुल बसची परिवहन विभागामार्फत तपासणी करावी. स्कुलबसमध्ये महिला कर्मचारी असणे आवश्यक असावे. त्याचबरोबर वाहनासोबतच्या सर्व कर्मचाऱ्यांची पोलीसांमार्फत चारित्र्य पडताळणी करावी. स्कुल बसमध्ये जीपीएस ट्रॅकर ॲप सुरु करावेत व ते पालकांच्या मोबाईलवर जोडावेत. बाहृय व्यक्तिंना प्रवेश देतांना त्यांच्या सर्व नोंदी ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपआपल्या शाळेतील अडीअडचणींची माहिती बैठकीत दिली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ऑनलाईन तसेच ऑफलाईन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares