कारभारावर टीका करीत भाजपाला ठोकला रामराम
धुळे शहर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढते आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आणि आता मावळते नगरसेवक असलेले संजय रामदास पाटील यांचे ही नाव इच्छुकांच्या यादीत घेतले जाते आहे. सुप्तावस्थेत ते देखील आपल्या पद्धतीने जनसंपर्क करीत असून भाजपाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा हे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानले जाते आहे.
संजय पाटील यांनी भाजपच्या शहरजिल्हाध्यक्षांना आपला राजीनामा सोपवला असून त्यांनी पक्ष व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर कठोर टीका केली आहे.
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे कि, गेल्या पाच-सहा वर्षापासून भारतीय जनता पक्षात सक्रिय होतो. सन २०१८ सालच्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत तत्कालीन पक्ष नेतृत्वाच्या आग्रहाने मी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून प्रभाग क्र. ११ मधून धुळे महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक लढलो आणि जिंकलो. त्यावेळी धुळे महानगरपालिकेत नगरसेवकपदी कार्यरत असताना मी पालिकेच्या अनागोंदी कारभारावर सातत्याने बोट ठेवून जनहिताची बाजू लावून धरली. परंतू ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेचे रात्रंदिन प्रवचन करणाऱ्या पक्ष संघटनेने आणि पक्षश्रेष्ठींनी माझ्या मुद्यांना केराची टोपली दाखवली आणि मला बेदखल करत सातत्याने हेटाळणीची भूमिका स्वीकारली. ङ्गमध्यंतरी पक्षनेतृत्वाच्या आदेशान्वये धुळे महानगरपालिकेचे बरखास्त झालेले ‘इतर मागासवर्गीय’ महापौरपदाचे आरक्षण मी स्वखर्चाने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करून वाचवले. त्यानंतर पक्षाने कुठल्याही निर्णयप्रक्रियेत मला सहभागी करून घेतले नाही. महाराष्ट्राचे सामाजिक संतुलन गेल्या पाच वर्षात सातत्याने बिघडत ठेवले जात आहे. राज्यात सामाजिक वातावरण दूषित करत जातीय आणि धार्मिक तणाव वाढीसाठी भारतीय जनता पक्ष आणि स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न होत आहेत. त्याची अनेक उदाहरणे धुळे शहराच्या गल्लोगल्ली फिरताना सहज आढळतील. अशा परिस्थितीत हिंदू-मुस्लिम एकता आणि सामाजिक सदभावनेचा पुरस्कर्ता असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तिला आता भारतीय जनता पक्षात राहणे अशक्य आहे. या पत्राद्वारे मी भाजपच्या माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.