पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक, तक्रारदारांनी व्यक्त केले ऋण
धुळे जिल्ह्यात वेगवगेळ्या घटनांमध्ये दाखल झालेल्या गुन्हांचा योग्य रीतीने तपस करत तब्बल ७९ लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीचे कौतुक होत असून फिर्यादींनी पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्या आदेशाने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली हि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आज पोलीस मुख्यालयात विशेष कार्यक्रमात हा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला. यात चोरीस गेलेल्या रकमेसह मोटारसायकल, बुलेट, मोबाईल , ट्रॅक्टर अश्या एकूण १०६ फिर्यादींमधील हस्तगत केलेला ७८ लाख ९१ हजार ८५३ रुपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिक्षक श्रीकांत धिवरे होते, प्रास्ताविक अप्पर अधीक्षक किशोर काळे यांनी केले, तर आभार गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी मांडले. फिर्यादींच्या वतीने सुशिलाबाई ठाकूर (धुळे), सुनील सोनार (धरणगाव), नाना पाटील (धरणगाव), राजेंद्र सावळे (धुळे), संदीप पंचभाई (दोंडाईचा) यांनी मनोगत मांडले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी यांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे